पुणे - महाराष्ट्रात एकूण तीन शक्यता असून पहिली शक्यता ही सरकार कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे बदलणार आहे. यावर आशा न लावता एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम सुरू केले आहे. विदर्भात प्रचंड पूर आल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडले नाहीत. मात्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बाहेर पडले. एक प्रभावी, प्रखर, मजबूत विरोधीपक्ष म्हणून काम करणे हा एक पर्याय आहे. दुसऱ्या बाजूला राज्यात असे दिसत आहे की, हे आपापसात भांडत असेल तर 5 वर्षांपर्यंत हे घेऊन जाणार का? म्हणून सरकार बदलेल का माहीत नाही. मात्र, याच्यापेक्षा जास्त हे एकत्र काम करू शकत नाही. अशा परिस्थितीत मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर त्यादृष्टीने भारतीय जनता पक्ष तयारी करत आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरला भाजपतर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोथरूड येथे लोकसहभागातून स्वच्छतागृहांची सफाई आणि नुतनीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हा डहाणूकर कॉलनी येथील बुद्ध विहार तसेच आजूबाजूच्या परिसराची साफसफाई केली. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जे झालं ते शिवसेनेमुळेच झालं -
शिवसेना खासदार संजय राऊत काय म्हणाले याला महत्त्व नाही. तर घराघरात सध्या लोक घडणाऱ्या घटना पाहत आहेत. सर्वसामान्य लोकांना हे माहीत आहे की जे झालं ते शिवसेनेमुळे झाले आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची एवढी आस लागली की त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रचे, हिंदुत्ववादाचे नुकसान झाले तरी चालेल. त्यामुळे संजय राऊत यांनी सांगावे की युती तुटण्यात कोणाचा हात होता. भाजप म्हटले होते की मुख्यमंत्रीपद देऊ पण ते दिले नाही तर तुम्ही विरोधी पक्षात जायची तयारी दाखवायला हवी होती. मात्र, ज्यांना तुम्ही वर्षानुवर्षे शिव्या दिल्या त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. राऊत काहीही म्हणत असले पण लोकांना माहीत आहे की, एकत्र निवडणूक लढवून मोदींच्या चेहऱ्यावर मते मागून प्रत्यक्ष सरकार बनवताना शिवसेनेने स्वतःचा स्वार्थ साधला आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.