पुणे- शहरातील विमाननगर परिसरात दत्त मंदिराजवळ महापालिकेची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. तब्बल १० तास पाण्याची नासाडी झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गुरुवारी रात्री साडे अकरापासून हे पाणी वाहत आहे. तक्रार देऊनही त्यावर तातडीने कोणतीही कारवाई न झाल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. पिण्याचे पाणी वेळेवर मिळावे, यासाठी पुण्याच्या उपनगरातील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा महापालिकेवर मोर्चा काढला होता. परंतु, गुरुवारी मध्यरात्री विमाननगर परिसरातील पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाण्याचे उंच कारंजे उडत होते.
विमाननगर परिसरातील फुटलेली पाईपलाईन सकाळी ७ वाजता पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती समजली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन इतर कामगारांच्या मदतीने सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पाण्याची गळती रोखली. संपुर्ण शहरात पाणीकपातीचे संकट असताना पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. याप्रकरणी जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
एकीकडे राज्यात दुष्काळाने कहर केला आहे. राज्यातील जवळपास २५ जिल्ह्यांमध्ये पाण्याचे भीषण संकट निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. काही शहरांमध्ये ४ ते ५ तर काही ठिकाणी १५ ते २० दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिक टाहो फोडताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे पुण्यात महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता पाईपलाईन फुटली होती. मात्र, महापालिकेने पाईपलाईन त्वरीत दुरुस्त न केल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.