पुणे- पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि जिल्ह्यतील घाट क्षेत्रांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गही हळूहळू वाढविण्यात आल्याने मुठा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस शहरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार असून, घाट क्षेत्रांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात सध्या पाऊस कोसळत आहे. पुणे शहर आणि परिसरातही मागील तीन ते चार दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. समाधानाची बाब म्हणजे, शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरण साखळीतील पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.