डिंभे व चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
भिमाशंकर व सह्याद्री पर्वत रांगामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. चासकमान धरणातून 500 क्युसेस भिमानदीत व डिंभे धरणातून 5 हजार क्युसेक वेगाने घोडनदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
पुणे (राजगुरुनगर)-मागील एक महिन्यापुर्वी चासकमान व डिंभा धरण ओव्हरफ्लो झाले होते. मात्र कालपासुन भिमाशंकर व सह्याद्री पर्वत रांगामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. चासकमान धरणातून 500 क्युसेस भिमानदीत व डिंभे धरणातून 5 हजार क्युसेक वेगाने घोडनदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काल रात्रीपासुन खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. डोंगर दऱ्यातून वाहणारे ओढे नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर उभी पिके असणारी शेती पाण्याखाली गेली असुन शेतीसह शेतमालाचे नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसाचा जोर कायम राहिला तर धरणांतून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तसेच आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.