पुणे - गेल्या सहा दिवसांपासुन सह्याद्रीच्या दर्या-खोर्यात पावसाचा जोर कायम आहे. तर, चासकमान, भामा-आसखेड, डिंबा, कळमोडी, वडजगाव, माणिकडोह या धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असुन भीमा, भामा, इंद्रायणी, मिना, घोड या नद्या दुथडी भरुन वाहत आहे. अनेक ठिकाणी पुलांवरुन पुराचे पाणी जात असल्याने जाण्या-येण्याचे रस्ते बंद झाले आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यात मागील उन्हाळ्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला होता. जलाशय कोरडे ठाण पडले होते. मात्र, सध्या पाऊसाच्या जोरदार बँटिंगमुळे जलाशय भरले असुन, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दुष्काळी संकटाच्या भितीतुन दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील भात-शेती, बटाटा, सोयाबीन या पिकांना पोषक पाऊस होत असल्याने शेतकरी आनंदी आहे