महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांची कार्यतत्परता: चांदणी चौकात हरवलेल्या १० वर्षीय मुलाला सुखरूप पोहोचवले घरी - चांदणी चौक

आई-वडिलांच्या भांडणामुळे चांदणी चौकात हरवलेल्या मुलाला वारजे पोलिसांनी सुखरूप घरी पोहोचवले.

पोलीस आणि मुलाचे आई-वडील

By

Published : Mar 26, 2019, 7:46 PM IST

पुणे - वारजे पोलिसांनी आई-वडिलांच्या भांडणामुळे चांदणी चौकात हरवलेल्या १० वर्षीय मुलाला सुखरूप घरी पोहोचवले आहे. कातुर्डे आणि कामथे असे मुलाला घरी पोहोचवणाऱ्या पोलिसांची नावे आहेत.

वारजे पोलीस ठाण्याचे कर्मचारी कातुर्डे आणि कामथे हे रविवारी मध्यरात्री गस्त घालत असताना त्यांना १ वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकात १० वर्षाचा मुलगा रस्त्याच्या कडेला बसून रडताना आढळला. इतक्या रात्री एकट्या मुलाला पाहून पोलिसांनी त्याची चौकशी केली. यानंतर या मुलाने तो पिंपरी-चिंचवड शहरातील रुपीनगर येथे राहत असल्याचे सांगितले. तसेच सायकलवर फिरता फिरता रस्ता चुकल्यामुळे येथे आलो, असे सांगितले.

या घटनेनंतर पोलिसांनी त्या मुलाला वारजे पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर रात्रगस्त अधिकाऱ्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फोन करून सापडलेल्या मुलाची माहिती दिली. व्हॉटसअ‍ॅपवरून फोटो पाठवला आणि त्याच्या आई-वडिलांचा शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार चिखली पोलिसांनी रुपी नगर परिसरात शोध घेऊन मुलाची आई शशिकला बापू लांडगे यांचा पत्ता शोधून काढला आणि त्यांना मुलाविषयी माहिती देत वारजे पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.

दुसऱ्या दिवशी वारजे पोलीस ठाण्यात आलेल्या लांडगे यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली असता वेगळीच माहिती समोर आली. दोघा नवरा बायकोत सतत भांडणे व्हायची. त्यामुळे लांडगे या पतीपासून वेगळ्या रुपीनगर निगडी येथे राहतात. तर त्यांचे पती धायरी येथे राहतात. पोलिसांना सापडलेला मुलगा हा धायरी येथे वडिलांकडे राहत होता. मात्र, त्याला वडिलांकडे राहायचे नव्हते. त्यामुळे तो रविवारी आईकडे जाण्यासाठी निघाला. त्याला रस्ता सापडत नसल्यामुळे तो रडत बसला. मात्र, पोलिसांना खरा प्रकार सांगितला तर पोलीस परत वडिलांकडे देतील म्हणून त्याने पोलिसांना काही सांगितले नव्हते, असे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या इच्छेप्रमाणे त्याला आईच्या ताब्यात दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details