महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रवाशाचे मोटारीत विसरलेले पैसे पोलिसांनी शोध घेऊन केले परत

गावी जात असताना वाहनात ७० हजार रुपये प्रवाशाचे विसरले. परंतु, वाकड पोलिसांनी अनोळखी वाहनाचा शोध घेत सीसीटीव्हीच्या मदतीने मूळ मालकाला त्याची रक्कम परत केली आहे.

पैसे परत करताना पोलिस कर्मचारी

By

Published : Nov 4, 2019, 8:48 PM IST

Updated : Nov 4, 2019, 11:26 PM IST

पुणे- गावी जात असताना वाहनात ७० हजार रुपये प्रवाशाचे विसरले. परंतु, वाकड पोलिसांनी अनोळखी वाहनाचा शोध घेत सीसीटीव्हीच्या मदतीने मूळ मालकाला त्याची रक्कम परत केली आहे. निलेश मारुती साळुंखे असे तक्रारदार प्रवाशाचे नाव असून ते सध्या बोरीवली येथे राहतात. निलेश हे दिवाळीनिमित्त सातारा या मूळ गावी जात होते. तेव्हा ही घटना त्यांच्यासोबत घडली आहे. पैसे परत मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

प्रवाशाचे मोटारीत विसरलेले पैसे पोलिसांनी शोध घेऊन केले परत

सविस्तर माहिती अशी की, प्रवासी निलेश हे दिवाळीनिमित्त त्यांच्या मूळ गावी सातारा येथे निघाले होते. त्यांच्या सोबत असलेल्या बॅगेत ७० हजार रुपयांची रोख रक्कम होती. मुंबई येथून ते प्रवासी मोटारीत बसले, सोबत असलेली बॅग त्यांनी मोटारीच्या डिक्कीत ठेवली होती. सायंकाळच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमधील भूमकर चौक येथे मोटारीतून उतरले. घाईत ते बॅग घ्यायची विसरून गेले. परंतु, काही वेळानंतर पैसे असलेली बॅग मोटारीच्या डिक्कीत विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने वाकड पोलिसात जाऊन संबंधित घटनेची तक्रार दिली. निलेश यांना प्रवासी मोटारीचा क्रमांक माहीत नव्हता. त्यामुळे प्रवासी मोटार शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी एक पथक तयार केले.

ज्या ठिकाणी निलेश प्रवासी वाहनातून उतरले होते तिथे कसून चौकशी करण्यात आली. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही तपासण्यात आले. तेव्हा, निलेश हे एका मोटारीतून उतरल्याचे दिसले, त्याच मोटारीत पैसे असलेली बॅग असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तातडीने वाहनचालक दिनेश कसबे (रा.सुसगाव, पुणे) याच्याकडे जाऊन त्याच्या मोटारीच्या डिक्कीतील रोख रक्कम ७० हजार रुपये असलेली बॅग मिळवली.


निलेश यांना संबंधित रक्कम वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या हस्ते परत करण्यात आली. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक बाबर, पोलीस कर्मचारी सचिन नरुटे, विक्रम कुदळे, सूरज सुतार, प्रशांत गिलबिले यांनी केली.

Last Updated : Nov 4, 2019, 11:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details