महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरूर लोकसभा मतदारसंघ : कोण होणार खासदार, गावागावात चर्चेला उधाण

शिरुर लोकसभा मतदार संघात कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यातील ही राजकीय दंगलीची लढाई चुरशीची झाली. अन् आता गावागावात कोण होणार खासदार? ही चर्चा रंगायला लागली आहे.

आढळराव पाटील आण अभिनेता अमोल कोल्हे

By

Published : Apr 30, 2019, 4:35 PM IST

पुणे - शिरुर लोकसभा मतदार संघात सलग ३ वेळा खासदारकीची ‘हॅट्ट्रिक’ करणारे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळरावपाटील यांच्या विरुद्ध अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्ये सामना रंगला होता. सोमवारीच या लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीत ५९.४६ टक्के एवढे मतदान झाले. आता मतदारराजा नेमका कोणाला ‘कौल’ देणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून अनेक चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या महिनाभरात शिरूरची रणधुमाळीची दंगल विविध कारणांनी चर्चेत आली आहे. जातीपातीच्या राजकारणामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. विमानतळ, बैलगाडा शर्यतबंदी, पुणे-नाशिक रेल्वे, महामार्गांवरील वाहतूक कोंडी या प्रमुख मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली. यावेळी आरोप-प्रत्यारोप झाले, तर दिग्गज नेत्यांच्या सभाही या मतदार संघात गजल्या. शिवाजीराव आढळराव यांचा ‘चौकार’ आणि डॉ. अमोल कोल्हेंकडून त्यांचा होणारा ‘त्रिफळा’ या भोवतीच निवडणुकीचा प्रचार खेळत होता.

अभिनेता डॉ. अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीत तेवढी गटबाजी पहायला मिळाली नाही, तर शिवाजीराव आढळराव पाटलांना भाजपची मोठी साथ मिळाली. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघात कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यातील ही राजकीय दंगलीची लढाई चुरशीची झाली. अन् आता गावागावात कोण होणार खासदार? ही चर्चा रंगायला लागली आहे.

दरम्यान २३ मे'ला या शिरूर लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण देशाचा निकाल लागणार आहे. मात्र, बहुचर्चित ठरलेल्या या लढतीमुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघानिहाय मतदानाची टक्केवारी -

  1. जुन्नर -– ६४.९० टक्के
  2. आंबेगाव -– ७०.२९ टक्के
  3. खेड-आळंदी – ६२.७६ टक्के
  4. शिरूर – ६१.५२ टक्के
  5. भोसरी – ५७.४८ टक्के
  6. हडपसर – ४७.४८ टक्के

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी -
एकूण मतदार संख्या २१ लाख ७३ हजार ४८४

  1. जुन्नर –- १ लाख ९३ हजार ९६५
  2. आंबेगाव -– १ लाख ९७ हजार ०५२
  3. खेड-आळंदी -– २ लाख ०२ हजार ७४०
  4. शिरूर –- २ लाख २७ हजार ५४१
  5. भोसरी –- २ लाक ३७ हजार ७६७
  6. हडपसर –- २ लाख ३३ हजार ३१६

एकूण झालेले मतदान - १२ लाख ९२ हजार ३८१

ABOUT THE AUTHOR

...view details