पुणे - सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी व्यक्ती रातोरात प्रसिद्ध व्हायला काहीच वेळ लागत नाही. अर्थातच त्यासाठी ती घटना किंवा ते काम काहीतरी हटके असणं आवश्यक असतं. सध्या पुण्यातील एका घरकाम महिलेच्या बाबतीतही याचा प्रत्यय येतो. अत्यंत सामान्य जीवनशैली असलेल्या, चार घरात घरकाम करुन उदरनिर्वाह करणाऱ्या गीता काळे या नावाने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या नावाचे चक्क व्हीजीटिंग कार्ड तयार करण्यात आल्यामुळे त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
गीता काळे या पुण्यातील पाषाण भागात झोपडपट्टीत राहतात. याच परिसरात त्या घरकाम करतात. येथीलच धनश्री शिंदे यांच्याकडे घरकाम करत असताना त्यांना अधिक कामाची गरज असल्याचे गीता यांनी सांगितले. त्यावर धनश्री यांना व्हीजिटिंग कार्डची कल्पना सुचली.
धनश्री यांनीच ते कार्ड डिझाईन करून छापून घेतले. या कार्डवर गीता यांचा मोबाईल क्रमांक, भांडी घासणे, कपडे धुणे आणि झाडूकामाचे दरही टाकण्यात आले आहेत. त्यात अधिक स्पष्टता यावी म्हणून आधार कार्ड नंबरही जोडण्यात आला. प्रत्यक्षात कार्ड हातात आल्यावर धनश्री यांनी ते एका ग्रुपवर शेअर केले. त्यानंतर हे कार्ड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.