पुणे - प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे आज(गुरुवार) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी साडेनऊ वाजता कर्वे नगर इथल्या डॉन स्टुडिओ मध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमीत सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भिडे यांच्या मागे आई-वडील पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहेत. दिवंगत नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका आणि मराठी चित्रपटासाठी संगीत दिले आहे.
सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या भिडे यांनी उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले. त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्स च्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांना झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार अशा विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.