पुणे - शहरात वाहनांची तोडफोड झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळजाई वसाहत येथे ही घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी परिसरात दहशत माजवत कोयता, दगड आणि लाकडी दांडक्यांनी वाहनांची तोडफोड केली. या घटनेत 30 ते 35 वाहनांची तोडफोड झाली.
तळजाई वसाहत येथे शनिवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने दहशत माजवत रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांना लक्ष केले. त्यांनी तीन रिक्षा, कार आणि 25 ते 30 दुचाकींची तोडफोड केली. तोडफोड करत असताना हे टोळके जोरजोरात ओरडत होते, त्यामुळे भीतीपोटी नागरिक घराबाहेर येऊ शकले नाहीत. अर्धा ते पाऊण तास गोंधळ घातल्यानंतर हे अज्ञात टोळके निघून गेले. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.