पुणे- संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. "याची देही याची डोळा" हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. हा सोहळा आज पुणे येथे मुक्कामी आहे.
'वारी संपल्यावर घरी येते तेव्हा मनाला शांती मिळते, वाटते स्वतः विठ्ठल माझ्याशी बोलतोय' - washim
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वाशीम जिल्ह्यातील मनोरमा पुरी सहभागी झाल्या आहेत. आजपर्यंत त्यांच्या सात वाऱ्या झाल्यात.त्यांनी त्यांचा वारीतला अनुभव सांगितलाय त्यांच्याच शब्दात.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वाशीम जिल्ह्यातील मनोरमा पुरी सहभागी झाल्या आहेत. आजपर्यंत त्यांच्या सात वाऱ्या झाल्यात. त्यांनी त्यांचा वारीतला अनुभव सांगितलाय त्यांच्याच शब्दात. "सात वर्षे झाली, वारी करते. पहिल्यांदा वारीला आले तेव्हा वेगळं असं काही वाटलंच नाही. पण वारी संपल्यानंतर जेव्हा घरी गेले तेव्हा मनाला शांती मिळाली. स्वतः विठ्ठल माझ्याशी बोलतोय असं वाटायला लागलं. त्यानंतर मी दरवर्षी वारीला जायचं ठरवलं आणि तेव्हापासून मी न चुकता वारीला येते, असं त्या म्हणाल्या.
मनोरमा पुढे म्हणाल्या, "आता वारीला मी एकटी येत नाही. दहा-पंधरा इतर ओळखीच्या स्त्रीयाही माझ्यासोबत असतात. पालखीसोबत जाताना माझा दिवस खूप आनंदात जातो. काकड आरतीने माझी पहाट होते. त्यानंतर दिवसभर भजन कीर्तन, रात्री हरिपाठ आणि कीर्तन यामध्ये दिवस कसा जातो ते कळतही नाही. ऊन, वारा, पाऊस काहीही असो आम्ही कुठेच थांबत नाही, पालखीसोबत आम्ही न थकता, न थांबता चालतचं राहतो." शेवटी बोलताना त्या म्हणाल्या, "अकरा महिने मी घरात काम करते आणि त्यानंतर एक महिना तरी पांडुरंगासाठी द्यायचाच असं मनाशी ठरवून वारीचा हा महिना मी देवासाठी देते."