विविध पक्षांसह संघटनांचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करताना
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. तसेच रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत आता सर्व पक्ष आणि नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे विविध पक्ष तसेच संघटनांकडून पेढे वाटपासह फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
राजीनामा मंजूरीनंतर जल्लोष : मराठा क्रांती मूक मोर्चा तर्फे पुण्यातील लाल महाल येथे फटाके फोडत साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाके फोडून पेढे वाटप करून आनंदउत्सव साजरा करण्यात आला आहे.
राजीनाम्याची होती मागणी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सातत्याने त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत होती. राज्यपाल यांची हकालपट्टी व्हावी, अशी मागणी राज्यभर विविध पक्ष तसेच विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली होती. आज राज्यपाल यांचा राजीनामा स्वीकारल्याने आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत, असे यावेळी मराठा क्रांती मोर्चा तर्फे सांगण्यात आले आहे.
राज्यपालांनी पत्राद्वारे केली होती मागणी : भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून असलेली कारकीर्द ही प्रचंड वादग्रस्त ठरली. मग तो पहाटेचा शपथविधी असो किंवा शिवरायांविषयीचे वक्तव्य, त्यांनी पदावरून पायउतार होण्याचीही मागणी सातत्याने होत होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती. तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात केल्याची माहिती त्यांनी स्वतःहून दिली होती. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ही मागणी मान्य झाली आहे.
हेही वाचा :Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अन् वादग्रस्त वक्तव्य; वाचा सविस्तर