पुणे - जुन्नर तालुक्यातील लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपती देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून 25 रुपये तिकीट शुल्क आकारले जाते. लेण्याद्री हा अष्टविनायक गणपतींपैकी सहावा गणपती आहे. त्यामुळे, इथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. पुरातत्व विभागाकडून आकरले जाणारे हे तिकीट शुल्क तातडीने रद्द व्हावे या मागणीसाठी लेण्याद्री ग्रामस्थ, लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट, संपूर्ण स्वराज्य निर्माण संस्था, आदिवासी ठाकर समाज आणि मराठा सेवा संघ यांच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.
स्थानिक दुकानदारांनी सुद्धा आपली दुकाने बंद करून या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. तिकीट शुल्कासंबंधात ग्रामस्थांच्या वतीने केले जाणारे 5 वर्षातील हे तिसरे आंदोलन आहे. पुरातत्व विभागाच्या मुंबई येथील क्षेत्रीय निरीक्षक डॉ. नंबी राजन यांनी 2 मे 2019 ला ग्रामस्थांना लेखी शब्द दिला होता. त्यानंतर प्राथमिक चर्चेत तालुक्यातील भाविकांसाठी तिकीट शुल्क रद्द करण्यात आले होते.