पुणे- मांजरीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ऊस दरवाढीबाबत आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यात न आल्याने वंचितच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मांजरीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर आयुक्तांची ऊस भाववाढी संदर्भात आज (दि. 27 ऑक्टोबर) बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होती. या बैठकीला विनायक मेटे, भाजप आमदार सुरेश धस यांनाही निमंत्रण नव्हते. मात्र, त्यांना ऐनवेळी प्रवेश देण्यात आला. पण, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बैठकीला जाण्यापासून रोखण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर यांना पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह अटक करून अज्ञातस्थळी नेल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.