पुणे- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलीस दल जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा बजावत आहे. मात्र बारामती शहरात आपले कर्तव्य बजावून परत घराकडे निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत पोलीस जवान गंभीर जखमी झाला आहे. एम. डी. पवार असे त्या जखमी जवानाचे नाव आहे.
बारामतीत पोलीस जवानाला अज्ञात वाहनाची धडक; अपघातानंतर वाहन घेऊन चालक पसार कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने शहरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी एम. डी. पवार हे बंदोबस्तावर तैनात होते. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास आपले कर्तव्य बजावून दुचाकीवरून ते घरी निघाले होते. यावेळी जळोची लाकडी रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव कारने पोलीस कर्मचारी पवार यांना समोरासमोर धडक दिली. या अपघातात पवार यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांनी वर्दीतील जखमी पवार यांना बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी पुण्यात पाठविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहायक निरीक्षक पद्मराज गंपले व सहकारी यांनी पवार यांच्यावर तात्काळ उपचारासाठी प्रयत्न केले.
धडक देऊन पसार झालेल्या चालकाचा शोध सुरू आहे. कोरोना सारख्या महामारीपासून लोकांचा बचाव करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून पोलीस यंत्रणा जीवतोड काम करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडू नका, गर्दी टाळा, सामाजिक अंतर राखा, असे वारंवार आवाहन करूनही नागरिक घराबाहेर पडत आहेत. पोलीस प्रशासनाकडून आता वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. चालकाकडे वाहन परवाना आहे, की नाही याची माहिती घेतली जात आहे. तसेच कोणत्याही कामाशिवाय बाहेर पडणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.