पुणे - सहकारनगर परिसरातील चाळीस वाहनांचे नुकसान केल्याची घटना ताजी असतानाच सिंहगड रस्त्यावर असाच आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने सिंहगड रस्ता येथील रहिवासी भागात पार्क केलेल्या 30 ते 40 दुचाकी ढकलून दिल्या. त्यामुळे या सर्व गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या घटनांमधून समाजकंटक दहशत पसरवत असल्याचा संशय आहे. या घटनेची सिंहगड रस्ता पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा -पुण्यात धावत्या एसटी बसला अचानक आग, सर्व प्रवासी सुखरुप
मागील वर्षभरात पुणे शहरात 30 हून अधिक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये 400 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. अशा प्रकारच्या घटनांमधून गुन्हेगारांवर पोलिसांचा कसलाही वचक राहिला नसल्याचे दिसून येते.
हेही वाचा -पुणे रेल्वे स्थानकात आढळली एके ४७ ची जीवंत काडतुसे
झोपडपट्टी परिसरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडताना दिसतात. त्या त्या परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नातून टोळक्यांकडून वाहनांना टार्गेट केले जाते. मागील चार वर्षात अशा घटनांमध्ये वाढ झाली असून यात सर्वसामान्य पुणेकरांच्या वाहनांचे 1 कोटीहून अधिकचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे जाळपोळ आणि तोडफोड करण्यामागे शेजाऱ्यांशी असणारे वाद आप आपसातील हेवेदावे हेदेखील कारणीभूत असल्याचे निष्पन्न आतापर्यंत अनेकदा झाले आहे.