पहा जुन्नर तालुक्यातील सफरचंदाची शेती पुणे : गेल्या काही वर्षांपासून उच्च शिक्षित तरुण नोकरी मिळत नसल्याने शेतीकडे वळू लागले आहेत. या तरुणांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग करायला सुरवात केली आहे. नुकतेच पुण्यात एका युवकाने कश्मिरी केसरची शेती सुरु केली होती. आता पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील दोन उच्च शिक्षित भावांनी आधुनिक शेतीचा प्रयोग करून शेतात कश्मिरी सफरचंदाची लागवड केली आहे.
दोन्ही तरुण उच्चशिक्षित आहेत :जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावात राहणारे अशोक नामदेवराव जाधव यांचे मुले प्रणय जाधव आणि तुषार जाधव दोघेही उच्चशिक्षित आहेत. प्रणय हा एम. कॉम आहे तर तुषार बी. कॉम झालेला आहे. या दोघा भावंडांनी प्रयोग करत जुन्नरमध्येच सफरचंदाची शेती केली आहे. त्यांचे वडील गेल्या पंचवीस वर्षांपासून पेंढार गावात द्राक्षाची शेती करत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेत मालाला चांगला दर मिळत नसल्याने दोन्ही भावंडांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीवर अभ्यास करत शेतात कश्मिरी सफरचंदाची लागवड केली आहे.
आमच्या शेजारील गावातील नातलगांकडून आम्हाला सफरचंदाच्या शेतीची माहिती मिळाली. त्यांच्याच माध्यमातून आम्ही सफरचंदाची लागवड केली. डिसेंबर 2019 मध्ये आम्ही याला सुरुवात केली. लागवड केल्यानंतर तीन वर्षात आम्ही यावर मोठा खर्च करत शेण खत तसेच रासायनिक खते देखील पुरवले आहेत. या डिसेंबर महिन्यात आम्ही त्यांची छाटणी केली. पानगळ करून ही छाटणी केली आहे. त्यामुळे आता चांगली सफरचंद आली आहेत. - तुषार जाधव, आधुनिक शेतकरी
सफरचंदांचा सविस्तर अभ्यास केला :या दोन्ही भावांनी सफरचंदाच्या शेतीची माहिती घेतल्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये सुमारे अर्धा एकर 'हरमन 99' या जातीची 150 झाडांची लागवड केली. याची रोपे त्यांनी काश्मीरमधून मागविली. त्यांनी रोपांची कशी लागवड करायची?, रोपांना कसे जगवायचे?, याबाबत सर्व माहिती गोळा केली. त्यानंतर यासाठी कुठली खते वापरायची याविषयी देखील सविस्तर अभ्यास केला. या पिकांना शेणखत व रासायनिक खते देण्यात आली आहेत.
जेव्हा आम्ही 2019 साली याची लागवड केली तेव्हा 2 वर्षानंतर झाड मोठी झाली आणि पिक यायला सुरवात झाली. जी 150 रोपं आम्ही लावली होती ती दोन वर्षानंतर मोठी झाली. मागच्या वर्षी जास्त पाऊस झाल्याने या झाडांना कमी फळे आली होती. आम्ही डिसेंबर मध्ये त्याची छाटणी केली. पण यंदा झाडांना चांगले फळे आली आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी चांगले उत्पन्न मिळणार आहे. या संपूर्ण शेतीसाठी आम्हाला आत्तापर्यंत 1 ते 1.5 लाख रुपये खर्च आला आहे. पण हे रोप दहा वर्ष फळ देणार असल्याने यातून आम्हाला चांगले उत्पन्न मिळणार आहे. आम्ही महिन्याभरात यांना बाजारामध्ये विक्रीस नेणार आहोत. - प्रणव जाधव, आधुनिक शेतकरी
या दोन्ही भावंडांनी केलेला हा आधुनिक शेतीचा भन्नाट प्रयोग सद्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरीच्या मागे न लागता हे तरुण आधुनिक शेतीकडे वळाले आणि येत्या काळात त्यांना यात चांगले यश मिळणार हे नक्की आहे.
हेही वाचा :
- Bogus Degree Certificate Scam: उच्चशिक्षित तरुणाने यूट्यूबवर बघून सुरू केले 'बोगस विद्यापीठ'; 2700 हून जास्त डिग्रींचे वाटप
- Ambulance For Animals : प्राण्यांवर तत्काळ उपचार करण्यासाठी या पठ्ठ्याने बनवली अत्याधुनिक रुग्णवाहिका!
- Pune Panipuri : महिलांनी फस्त केल्या तब्बल ५ हज्जार पाणी पुरी प्लेट; नातीपासून ते आजीपर्यंत घेतला अनेक महिलांनी आस्वाद...