पुणे : रामदास आठवले म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मित्र पक्षांची मुंबईत बैठक झाली असून, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात 'रिपाइं'ला एक मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. तसेच जागा वाटपात विधान परिषदेची एक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत योग्य वाटा मागितला आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण रोटेशन पद्धतीने होत आहे. मात्र, जिथे दलित वस्ती नाही, तिथे आमचा माणूस निवडून येत नाही. म्हणून आरक्षणाची रोटेशन बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करत आहोत, असे देखील यावेळी आठवले म्हणाले. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
आरोपींना कठोर शिक्षा करा:भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत आठवले म्हणाले की, जो हल्ला झाला आहे ते खूप दुर्दैवी आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. या हल्ल्याचा निषेध करतो. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने याची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करायला हवी, असे देखील यावेळी आठवले म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकारला धोका नाही :राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. याबाबत आठवले यांना विचारले असता ते म्हणाले की, वेगवेगळ्या क्षेत्रात भारताने आघाडी घेतली असून, रोजगार निर्मितीस प्राधान्य दिले जात आहे. लाखो लोकांना सरकारी नोकरीत सामावून घेतले जात आहे. खासगी उद्योगास प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यातही उद्योग वाढवले जात असून, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. विरोधकांनी प्रत्येक गोष्टीला विरोध करणे चुकीचे आहे. सरकारला सहकार्य करणे ही लोकशाही आहे. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार चांगले चालले आहे. या सरकारला कोणताही धोका नाही. शिंदे-फडणवीस आपला कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढील पाच वर्षे त्यांचीच सत्ता येईल, असे देखील यावेळी आठवले म्हणाले.