पुणे -केंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही केला जात आहे. या माध्यमातून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांच्या हस्ते आज (शनिवारी) पुण्यातील एका शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले, ईडीचा गैरवापर अशाप्रकारे यापूर्वी कधीही झाला नव्हता. मात्र, आताच्या सरकारने विरोधकांना नमवण्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्यास सुरुवात केली. मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब आणि दक्षिणेतील इतर काही राज्यात या माध्यमाचा गैरवापर सुरू आहे.
राजू शेट्टींबद्दल बोलायचे नाही...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे विधानपरिषदेतील आमदाराच्या यादीतून नाव कापल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर विचारले असता शरद पवार म्हणाले, राजू शेट्टी नाराज असतील तर त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. परंतु या जास्त काही चर्चा सुरू आहेत यात कुठलीही तथ्य नाही. राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेती क्षेत्रात जे काम केले आहे ते पाहून त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, असा प्रस्ताव आम्ही राज्यपालांना दिलेला आहे. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे केला आहे. आता अंतिम निर्णय राज्यपालांना घ्यायचा आहे. राजू शेट्टी काय म्हणाले याबद्दल मला काही बोलायचं नाही. आम्ही आमचा शब्द पाळला आहे, आता आम्ही राज्यपालांच्या निर्णयाची वाट बघत आहोत.