पुणे- मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आंबेगाव तालुक्यात घडली आहे. मामाकडे शिक्षणासाठी असलेल्या अल्पवयीन भाचीवर मामानेच बलात्कार केल्याची घटना घडली. नराधम मामाचा अत्याचार वाढल्याने, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याने पीडित मुलीने मामाची तक्रार थेट 100 नंबरवर फोन करून दिली. त्यानंतर मंचर पोलिसांनी आजीच्या तक्रारीवरून नराधम मामाच्या मुसक्या आवळल्या.
पीडित मुलगी शिक्षणासाठी मामाकडे राहत असताना पीडित मुलीवर मामाने चार वेळा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मामाचा हा अत्याचार वाढत गेल्याने पीडित मुलीने ही घटना पालकांना सांगण्याऐवजी थेट पोलिसांमध्ये 100 नंबरला कॉल करून सांगितली. या घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोपे व मंचर पोलिसांनी पीडित मुलीच्या आजीची तक्रार नोंदवून भा. दं. वि. 376, 323, 506 कलमानुसार गुन्हा दाखल करून नराधमाला मामाला अटक केली आहे.