पुणे - शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या वादावर आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण नेमका कोणाचा यावर शिक्कामोर्तब होईल. या सुनावणीला ठाकरे आणि शिंदे गटातील नेते आज दिल्लीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील या सत्तासंघर्षावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाअगोदर निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय देऊ नये, असे उल्हास बापट हे म्हणाले आहेत. आज आयोगाने निकाल दिला आणि उद्या सर्वोच्च न्यायालयात 16 आमदार निलंबित झाले, तर आयोगाचा निकाल हास्यास्पद ठरेल, असेही उल्हास बापट यावेळी म्हणाले.
दोन्ही गटांचा शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावाएकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने शिंदे गटाची बाजू ऐकूण घेतली होती. आजच्या सुनावणीत ठाकरे गट आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीच्या दृष्टीने ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज निर्णय होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची संपणार मुदतउद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. याबाबतही आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. यावर देखील उल्हास बापट म्हणाले, की भारतात पार्टी सिस्टीमला खूप महत्व आहे. पक्षाला मान्यता किंवा चिन्ह देणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. चिन्ह देखिल निवडणूक आयोगच ठरवत असतो. पक्षात फूट अनेकदा पडतात, पण महाराष्ट्राचा विषय वेगळा आहे. लवकरात लवकर निर्णय येणे आवश्यक असल्याचेही बापट यावेळी म्हणाले.
निवडून आलेले पदाधिकारी शिंदे गटाकडे जास्तशिंदे गटाकडे निवडून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. पण पक्षाचा होल्ड पुर्णपणे ठाकरेकडे आहे. आता तरी निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय घेऊ नये. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आधी येऊ द्या. निकाल कशाच्या आधारावर येऊ शकतो, या विषयावर मी बोलणार नाही. याचे सगळे आधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. चीफ इलेक्शन कमिशनरला कुणी काढू शकत नाही. त्यांच्या पदाची गॅरंटी आहे. आधी सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे आवश्यक आहे. आज जरी निवडणूक आयोगाचा निकाल आला, तरी याचा परिणाम सुप्रीम कोर्टाच्या निकालावर होणार नाही, असे देखील उल्हास बापट यावेळी म्हणाले.
हेही वाचा - धनुष्यबाण कुणाच्या गटात! निवडणूक आयोगासमोर सुनावणी; आजच होणार फैसला?