बारामती - बारामती लोकसभा मतदारसंघातील उजनीच्या जलाशयाचा वापर जल-हवाई वाहतूकीसाठी करता येणे शक्य आहे. त्यामुळे या जलसाठ्याचा समावेश 'उडान-रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम' मध्ये करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले.
उजनीच्या जलसाठ्यापासून पुण्यातील लोहगाव विमानतळ १२५ कि.मी. अंतरावर आहे. याबरोबरच महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणारी पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर ही धार्मिक स्थळेही जवळच आहेत. याठिकाणी विमानांची वाहतूक सुरु झाल्यास त्याला उत्तम प्रतिसाद मिळू शकेल. नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि मुंबई ही विमानतळांना जोडणारे ठिकाण म्हणून या जलसाठ्याचा अजून विकास करता येईल. याचबरोबर गोवा, ठाणे क्रिक, साबरमती वॉटर-फ्रंट आणि सरदार सरोवरातील प्रस्तावित व सध्या अस्तित्वात असणाऱ्या जल-हवाई केंद्रांना जोडणारे हे ठिकाण ठरु शकेल, असे सुप्रिया सुळे यांनी निवेदनात म्हटले आहे. भिगवण येथील पक्षी अभयारण्य (बर्ड सँक्चुरी) येथून जाता येईल. वरील सर्व गोष्टींना विचारात घेता, उजनी जलसाठ्याचा समावेश 'उडान-रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम' मध्ये करावा अशी मागणी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री पुरी यांच्याकडे केली आहे. या मागणीवर केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास आहे, असे सुळे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सल्लागार पीके सिन्हा यांचा राजीनामा