पुणे - शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे बैलगाडा शर्यत. ही बैलगाडा शर्यत बंद असताना शेतकऱ्यांसह शिवसेनेने या बंदीविरोधात मोठा लढा दिला आहे. मात्र, विरोधक या बैलगाडा शर्यतबंदीचे भांडवल करून मते मागुन दिशाभुल करत आहेत. पुढील काळात ही बैलगाडा शर्यत बंदी सरकारच्या माध्यमातून मीच उठवणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. काल (२५ एप्रिल) चाकण येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
मतांच्या राजकारणासाठी बैलगाडा शर्यतीचे भांडवल करु नका, बैलगाडा शर्यतबंदी मीच उठवणार -उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात मतांचे राजकारण सुरू असताना सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा खासदार जनतेला हवा असतो. मात्र, हाच खासदार सिनेमा, नाटक किंवा मालिकेत काम करणारा असेल, तर तो जनतेचे प्रश्न कसा सोडवणार, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर उपस्थित केला.
या सभेत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करत शिरूर लोकसभेमध्ये आमच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. तर, दुसरीकडे यांच्याजवळ पंतप्रधानपदासाठी उमेदवारच नाही. त्यामुळे मते कुणाच्या नावावर मागता, असे खडे बोलही त्यांनी लगावले.
डॉ. अमोल कोल्हे यांच्यावरही त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून निशाणा साधला. मालिकेच्या माध्यमातून भगव्याची निष्ठा शिकवली जाते. मग स्वतः जवळची निष्ठा कुठे जाते, असा टोला त्यांनी लगावला.
आपल्या देशावर झालेल्या दहशत दहशतवादी हल्ल्यानंतर युतीच्या सरकारने सर्जिकल स्ट्राइक केले. यामध्ये आपल्या जवानांचे शौर्य हे महत्त्वाचे होते. आता याच सर्जिकल स्ट्राइकवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, जवानांच्या शौर्यावर शंका उपस्थित करताना तुम्हाला लाज तरी का वाटत नाही? असेही ते म्हणाले.