पुणे -शरद पवार यांचा वरदहस्त असल्यामुळेच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. नाशिक महामार्गाच्या बाह्य वळण आणि घाटाच्या उद्घाटनावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवाद पाहायला मिळाला. या प्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.
प्रतिक्रिया देताना खासदार डॉ. अमोल कोल्हे दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक दिवस अगोदरच या बाह्य वळण आणि घाटाचे उद्घाटन केले आहे. निमंत्रण पत्रिकेत आढळराव पाटील यांचे नाव नाही. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा या निमंत्रण पत्रिकेत फोटोही नाही. त्यामुळे माजी खासदार आढळराव पाटील यांनी एक दिवस अगोदरच आक्रमक होत, शिवसैनिकांसह खेडच्या घाटाचे आणि नारायणगाव बाह्य वळणाचे उद्घाटन उरकून घेतले.
हेही वाचा -PowerGame? : शरद पवारांनी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट, तासभर खलबतं; तर्क-वितर्कांना उधाण
- आढळराव पाटील यांची डॉ. कोल्हे यांच्यावर टीका -
यावेळी डॉ. कोल्हे यांचे या पुणे-नाशिक महामार्गाच्या कामात कोणतेही योगदान नाही. विनाकारण या कामाचे श्रेय खासदार डॉ. कोल्हे घेत आहेत. खुद्द रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या विभागाचे माजी खासदार आढळराव पाटील यांच्या आग्रहाने बाह्य वळणाचे टेंडर मंजूर केले आहे, असे सांगितले होते. कधीतरी मतदारसंघात यायचं, घाटात उभं राहायचं, फोटो काढायचे आणि निघून जायचं, त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणजे फक्त राष्ट्रवादीच नाही, बाकीचे पण पक्ष आहेत, गेल्या दोन वर्षात खासदार झाल्यापासून मतदारसंघात एक रुपयाचेही काम केले नाही, हे म्हणजे चित्रपटातील, नाटकातील डायलॉग नाही, लोकांची अशी फसवणूक करावी, अशा शब्दात माजी खासदार आढळराव पाटील यांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली.
आज(17 जुलै) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या कामाचे उद्घाटन केले. यावेळी डॉ. कोल्हे यांनीही आढळराव पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, पद गेल्यानंतर जी अस्वस्थता असते ती राज्य पातळीवर पाहायला मिळाली आणि शिरूर लोकसभेतही पाहायला मिळते. अशा वयस्कर नेत्यांनी पोरकटपणा करावा याचं मला आश्चर्य वाटतं. मी माजी खासदारांना या कार्यक्रमाला बोलावणार होतो. कारण त्यांनीही पाठपुरावा केला आहे. रेल्वेच्या कामाचं श्रेय घेत असताना त्याच्या अपयशाचेही श्रेय घ्यावं, चाकणच्या वाहतूक कोंडीच्या अपयशाचे श्रेय घ्यावं. हो मी बोलतो पण संसदेत बोलतो. रेल्वेच्या कामाचं श्रेय हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे, तर पुणे - नाशिक महामार्गाचं श्रेय हे नितीन गडकरी यांचं आहे, असे खासदार कोल्हे म्हणाले.
- शिवसंपर्क अभियान पक्षवाढीसाठी आहे की आमच्यावर टीका करण्यासाठी - कोल्हे
रेल्वेच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या समस्या समोर बसून आपण कधी समजून घेतल्या का? जसं खेडचं विमानतळ घालवलं तसं हा रेल्वेचा प्रकल्प आम्ही घालवणार नाही. माजी खासदारांनी असा पोरकटपणा करू नये. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेलं शिवसंपर्क अभियान पक्षवाढीसाठी आहे की आमच्यावर टीका करण्यासाठी आहे? राज्यात महाविकस आघाडी आहे. मात्र, इथे नाही मुख्यमंत्र्यांबाबत आदर आहे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्याचं कारण शरद पवार यांचा वरदहस्त त्यांच्या डोक्यावर आहे, असं वक्तव्य खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. यावेळी माजी खासदार आढळराव पाटील यांच्यावर खासदार डॉ. कोल्हे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. आता यावर शिवसेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा -पंधरा दिवसांत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सीईटी परीक्षा घेणार - वर्षा गायकवाड