पुणे - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर विरोधी पक्षाकडून त्यांचा निषेध केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी देखील याबाबत त्यांची भूमिका मांडली आहे. भगत सिंह कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांची हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी उदयनराजे यांनी केली आहे. तसेच याबाबत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते. येत्या 28 तारखेला जर काही निर्णय नाही झाला तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असं देखील यावेळी उदयनराजे म्हणाले. (bhagat singh koshyari shivaji maharaj controversy).
आपली आजपर्यंतची वाटचाल कोणाच्या विचारांवर झाली? - छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जुना झाला हे जेव्हा मी राज्यपाल यांच्या तोंडून ऐकलं तेव्हा क्षणभर मला काही समजलं नाही. राज्यपालांनी जे वक्तव्य केलं त्याला आधार काय? ज्यावेळी देशभरात अनेक राजे लोक मुघल साम्राज्याला शरण गेले त्यावेळी एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना विरोध केला. लोकांना गुलामगिरीतून सोडवण्यासाठी, अत्याचार दूर करण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केलं. देशात, जगात अनेक योद्धे होऊन गेले पण शिवाजी महाराजांनी जी लढाई लढली ती सर्वसामान्य लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी होती. छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांचे स्फूर्तीस्थान आहेत. जर महाराजांचे विचार जुने झाले आहेत तर आपली आजपर्यंतची वाटचाल कोणाच्या विचारांवर झाली? असा सवाल यावेळी उदयनराजे यांनी केला.