दौंड(पुणे) - दौंड तालुक्यातील पाटस गावातील तामखडा येथे दोन तरुणांची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना रात्रीच्या (4 जुलै) सुमारास घडली. या घटनेने पाटस हादरले आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
माहिती देताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख दोन युवकांचा खून -
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 4 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास दौंड तालुक्यातील पाटस गावातील तामखडा येथील भनोबा मंदिरानजीक घडली. फोनवरून शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांचा काठ्या, तलवारी आणि डोक्यात दगड घालून निघृण हत्या करण्यात आली. दरम्यान, आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाले आहेत. याघटनेमुळे रात्रीपासून पाटसमध्ये तणावाचे वातावरण आहे.
आठ जणांवर गुन्हा दाखल -
शिवम संतोष शितकल (वय 23), गणेश रमेश माखर (वय २३ ) दोघेही रा. पाटस (अंबिकानगर ता.दौंड.जि.पुणे,) असे खून झालेल्या युवकांची नावे आहेत. याप्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत, महेश टुले (दोघे रा.पाटस तामखडा), योगेश शिंदे ( रा. गिरिम ता.दौंड जि.पुणे) व इतर चार ते पाच अनोळखी व्यक्तींचे नाव व पत्ता मिळाली नाही, अशी या आरोपींची नावे असून ते पसार झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवम शितकल आणि गणेश माखर यांना मन्या उर्फ महेश संजय भागवत यांच्यासोबत फोनवरून आई आणि बहिणीवर विनाकारण शिव्या दिल्या, शिव्या का दिल्या असा जाब विचारायला गेले असता आरोपींनी त्यांना काठ्या व तलवार आणि डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली. याबाबत अर्जुन संभाजी माखर ( वय १९ रा.पाटस ) याने यवत पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन पाहणी केली :
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच आरोपीच्या घरी जाऊन पोलीस अधीक्षकानी पाहणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.