पुणे- जुन्नर तालुक्यातील एका गावातील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत अत्याचार करतानाचे फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन तीन युवकांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक आणि अनुचित जाती जमाती अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना अटक केली आहे. तर एक जण फरार झाला आहे. दरम्यान "आदिवासी समाज संघटनेचे बिरसा ब्रिगेड" यांनी रात्रभर आंदोलन केल्याने जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
सौरभ भगवान वाळूंज, आदित्य गुलाब कबाडी असे अटक आरोपींची नावे आहेत. तर करण शिवाजी वाळूंज हा या घटनेनंतर फरार झाला आहे. या गंभीर आणि निंदनीय घटनेची तक्रार पीडित मुलीने सोमवारी (दि.२८ ) जुन्नर पोलीस ठाण्यात दिली. मात्र या घटनेचे गंभीर पडसाद जुन्नर तालुक्यात उमटले असून, परिस्थितीवर जुन्नर पोलीस लक्ष ठेवून आहेत.
फोटो प्रसारित करण्याची दिली धमकी-
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जवळे प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, "रविवार (ता.२०) रोजी पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बहिणीची मुलगी या शिवण कामासाठी गावातील शिवणकाम करणाऱ्या दुकानात गेल्या होत्या. दुकानातून घरी परत येत असतांना सौरभ वाळुंज आणि त्याचा मित्र करण यांनी त्यांचा पाठलाग केला. बैलगाडा घाटाच्या वरच्या बाजूला ज्वारीच्या मळ्याजवळ दोघांनी पीडित मुलीला ओढत शेतात नेले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्याशिवाय पीडित मुलीचे फोटो काढून, या घटनेबाबत कुणाला सांगितले तर फोटो सर्वत्र प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यामुळे केवळ भीतीमुळे पीडित मुलीने कोणालाही सांगितले नाही. मात्र घटनेनंतर दोन्ही तरुण आणि त्याचा मित्र आदित्य गुलाब कबाडी याच्या गाडीवर बसून फरार झाले.