जंगलात वास्तव्य करणारी दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद, 16 मोटारसायकली व 3 मोबाईल जप्त - मोटारसायकली जप्त
पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील शहरी भागातून दुचाकीवर पाळत ठेवून चोरी करून दुचाकीचे इंजिन व दुचाकीचे इतर भाग अदला-बदली करून विक्री करणारी पाच जणांची टोळी राजगुरुनगर पोलिसांच्या डीबी पथकाने गजाआड केली आहे. टोळीकडून चोरी केलेल्या १६ दुचाक्या व ३ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत.
राजगुरुनगर (पुणे) -पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील शहरी भागातून दुचाकीवर पाळत ठेवून चोरी करून दुचाकीचे इंजिन व दुचाकीचे इतर भाग अदला-बदली करून विक्री करणारी पाच जणांची टोळी राजगुरुनगर पोलिसांच्या डीबी पथकाने गजाआड केली आहे. अटक केलेल्या टोळीकडून 16 दुचाकी व 3 मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप व सतीश गुरव यांनी दिली
डोंगराळ व आदिवासी भागात झाडांवर वास्तव्य करून रात्रीच्या सुमारास शहरी भागातील दुचाकीवर पाळत ठेवून ही टोळी दुचाकी लंपास करत होती व चोरी केलेल्या दुचाकीचे पार्ट वेगळे करून वेगवेगळ्या गाड्यांना बसून विक्री करत होते याच दरम्यान या दुचाकी चोरांच्या टोळीची खबर राजगुरुनगर पोलिसांच्या डीबी पथकाला लागली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर पोलीसांचे डीबी पथक तपास करत असताना नवनाथ विजय पवार (वय 21) व सुनील रामनाथ जाधव (वय 19) या दोघांना चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांचे तीन साथीदार डोंगराळ भागातील जंगल वस्तीमध्ये झाडावरती वास्तव्य करत असल्याची खबर डीबी पथकाला मिळाली त्यानुसार रात्रीच्या सुमारास जंगलात झाडावर वास्तव्य करणाऱ्या आरोपींना राजगुरुनगर पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली. या अटक केलेल्या पाच जणांकडून वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केलेल्या 16 दुचाकी व 3 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.