बारामती- बारामती तालुक्यातील सोनकसवाडी येथे घातक हत्यारांंसह दोन घरांवर दरोडा टाकणाऱ्या दोन दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या दरोडेखोरांचा इंदापूर तालुक्यातील काटी येथील दरोड्यात देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. विकास किरण शिंदे (वय २५ रा. नांदल ता. फलटण जि. सातारा) व रावश्या कोब्या काळे( वय २५ रा. काटी ता. इंदापूर) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांना अटक केली आहे.
१६ फेब्रुवारीला पडला होता दरोडा
सोनकसवाडी येथील रुपेश हनुमंत लोखंडे व विजय साधू लोखंडे यांच्या घरावर दिनांक १६ फेब्रुवारी रोजी दरोडा पडला होता. चाकूचा धाक दाखवत सहा जणांनी दोन ठिकाणाहून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा सव्वा दोन लाख रुपयांचा माल लंपास केला होता. तसेच शेजारी असणाऱ्या गायकवाड मळ्यातील रोहन अशोक गायकवाड यांच्या घरातून २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
इंदापूर दरोड्यातील दोन आरोपींना अटक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केली अटक
या गुन्ह्याचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. रेकॉर्डवरील आरोपींची माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली असून, त्यांनी सोनकसवाडीसह काटी येथे दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. दरम्यान त्यांचे अन्य साथिदार फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.