दौंड (पुणे)पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकास दमदाटी करून, लूटल्याची घटना घडली होती. लूटमार करून साडेदहा हजारांची रोकड घेऊन, फरार झालेल्या दोन चोरांना पोलिसांनी टोल नाक्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेच्या मदतीने वाहनासह ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या ट्रकचालकाला लूटणारे आरोपी हे पाटस बारामती रोडवर असणाऱ्या एका हॉटेलचे चालक आणि वेटर असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तुषार राजेंद्र जगताप (वय 32, रा.रोटी, ता. दौंड, जि.पुणे )आणि जालिंदर साहेबराव विधाटे (रा.म्हैशगाव, जि.अहमदनगर, सध्या रा. हॅाटेल गावगाडा पाटस) असे या दोघांची नावे आहेत.
ट्रक चालकाकडून जबरदस्तीने पैसे घेतले
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकला आरोपींनी चारचाकी आडवी घालून थांबवले, त्यानंतर तुमचा ट्रक आमच्या गाडीला घासला असल्याचे सांगत, ट्रकचालकाला शिविगाळ केली, व त्याच्याकडे असलेले साडेदहा हजार रुपये घेऊन आरोपींनी पोबारा केला. दरम्यान याप्रकरणी ट्रकचालक हरी जमादार (भोसले) यांनी पाटस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
आरोपींना अटक
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलीस चौकीचे फौजदार रामभाऊ घाडगे, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण, बाळासाहेब पानसरे, विजय भापकर, सुधीर काळे, बाळासाहेब जगताप, डी.एन.कोळेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पाटस टोल नाक्याचे सी.सी.टिव्ही फुटेज तपासून सदर आरोपींचा शोध घेवून अवघ्या काही तासांमध्ये आरोपींना अटक केली आहे.