पुणे : पुणे पोलिसांनी राजस्थानच्या जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असलेलता सुफा या आतंकवादी टोळीशी संबंधित असलेल्या दोघांना पकडले आहे. राजस्थान पोलिसांनी 30 मार्च 2022 रोजी एका कारमधून स्फोटके घेऊन जाताना अल्तमस पुत्र बशीर खां शेरानी यास पकडले होते. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. एनआएने या संदर्भात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अनेकांना अटक केली होती. मात्र तेव्हापासून युनूस साकी, इम्रान आणि फिरोज पठाण हे तिघे फरार होते. ही संघटना दहशतवादी संघटनेपासून प्रेरणा घेऊन काम करत आहे.
संशयास्पद कागदपत्रे आढळली :या प्रकरणी पोलिसांनी इम्रान खान आणि युनूस साकी याला अटक केली आहे, तर फिरोज पठाण हा फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोथरुडमध्ये दोन परप्रांतीय तरुण संशयास्पदरित्या फिरत आहे, अशी माहिती मंगळवारी सायंकाळी ६ वाजता पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी 25 ते 30 वयोगटाच्या या दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे जिवंत काडतुसे मिळाली. मात्र, त्यांच्याकडे पिस्तुल मिळाले नाही. त्यांच्याकडील लॅपटॉपची पाहणी केली. त्यात काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. त्यामुळे त्यांचा एखाद्या दहशतवादी कृत्यामागे हात असू शकतो, असा संशय पोलिसांना आला. त्यामुळे लगेच ही माहिती दहशतवाद विरोधी पथकाला कळविण्यात आली आहे. एटीएस आणि पुणे पोलीस अधिक चौकशी करीत असल्याचे या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.