आंबेगाव (पुणे) -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात दोन हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि एका महिलेचा समावेश आहे. या दोन्ही स्वतंत्र घटना आहेत. या दोन्ही घटनेमुळे परिसरात विविध चर्चेला पांग फुटला आहे.
अशी झाली सचिन जाधवांची हत्या
पहिली घटना रात्री आठच्या सुमारास घडली आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सचिन जाधव यांची हत्या झाली असून ही हत्या पैशांच्या देवाण-घेवाणीतून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्यापासून जवळ असलेल्या कोंदेवाडी फाट्यावर या घटनेची सुरुवात झाली असून रात्री इथे सचिन जाधव यांचे बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी भांडण झाले. जाधव यांनी दिलेले पैसे परत दे असे म्हणत वाद वाढत गेला, यामधून थिटे आणि सुर्यवंशीने हत्या केली. तेथून जाधवांच्याच गाडीत मृतदेह टाकला आणि गाडी अहमदनगर जिल्ह्याच्या दिशेने घेवून गेले. नगर जिल्ह्यातील कोरथन घाट सुरू झाला. तिथे दरीत हा मृतदेह पेटवून दिला आणि गाडी तिथेच जवळपास सोडून दिली. पुरावे नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या घटनेचा तपास सुरू झाला आणि सकाळच्या सुमारास जळालेल्या अवस्थेत जाधव यांचा मृतदेह आढळला. तपासाची चक्र फिरताच थिटे आणि सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली आहे.