पुणे - शहरातील केईम रुग्णालयात अवघ्या दोन महिन्याच्या चिमुरड्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, सात दिवसानंतर त्याच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. या चिमुरड्याला तीन जूनला उपचारासाठी सोमवार पेठेतील केईम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या घशातील स्त्रावाची चाचणी करण्यात आली. चार जूनला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पुढील तीन दिवस त्याच्यावर केईम रुग्णालयातच उपचार करण्यात आले. पण सात जूनला त्याचा मृत्यू झाला.
पुण्यातील केईएममध्ये दोन महिन्याच्या चिमुरड्याचा कोरोनामुळे मृत्यू; सात दिवसानंतर बाब उघडकीस - kem hospital covid 19 death
पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळे 439 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात आजवर 9 हजार 336 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यातील 6 हजार 87 रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दररोज कोरोनाची आकडेवारी दिली जाते. यामध्ये नव्याने किती रुग्ण सापडले, डिस्चार्ज किती झाले, मृत्यूची आकडेवारी हे सर्व दररोज दिले जाते. मात्र, या चिमुरड्याचा मृत्यूला सात दिवस लोटले तरी याची माहिती जाहीर करण्यात आली नव्हती. शनिवारी (13 जून) दिलेल्या अहवालात या चिमुरड्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्या अहवालातील मृत्यूमुखी पडलेल्यांची आकडेवारी पहात असताना ही माहिती उघडकीस आली. दरम्यान, याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळे 439 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात आजवर 9 हजार 336 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यातील 6 हजार 87 रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहेत. तर 2810 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील 208 रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यातील 47 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.