खेड (पुणे) - निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे वहागाव येथील दोन घरांवरील छत उडाले आणि ते तिथेच कोसळले. त्यातील एक घटनेत मायलेकाचा मृत्यू झाला. तर, कुटुंबातील इतर व्यक्ती गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंजाबाई अनंता नवले (वय 65) आणि नारायण नवले (वय 45) अशी मृतांची नावे असून मंजाबाई यांचा बुधवारी तर, नारायण नवले यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
चक्रीवादळात छत कोसळून मायलेकाचा मृत्यू तर, अन्य तिघे गंभीर जखमी - निसर्ग चक्रीवादळ परिणाम
खेड तालुक्यातील वहागाव येथे चक्रीवादळात दोन घरांचे छत उडाले आणि त्याच ठिकाणी कोसळले. एका घटनेत मायलेकाचा मृत्यू झाला. तहसीलदार सुचित्रा आमले यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि पंचनामा करण्याचे आदेश दिले.
चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे वहागाव गावात बुधवारी दुपारच्या सुमारास नवले कुटुंबीय घरात बसले होते. यावेळी अचानक पावसाचा आणि वाऱ्याचा जोर वाढला. त्यामध्ये नवले कुटुंबीयांच्या नव्या घराचे छत चक्रीवादळात पूर्णपणे उडाले आणि तेथेच पडले यात घरातील मंजाबाई यांचा मृत्यू झाला. तर, आज पहाटे नारायण नवले यांचा मृत्यू झाला. या घटनेत कुटुंबातील तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरातील वस्तू आणि धान्यही पावसात खराब झाले आहे.
वहागाव येथील घटनेची महिती मिळताच तहसीलदार सुचित्रा आमले व जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि कुटुंबियांना धीर दिला. या घटनेचा तातडीने पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिले आहेत.