दौंड - इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे चोरीचे ट्रक विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यातील एक टिपर कर्नाटक येथून चोरून आणलेला होता तर एका ट्रकला बनावट नंबर प्लेट टाकण्यात आली होती. या कारवाईत एकूण २० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोघांना घेतले ताब्यात -
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत 2 चोरीचे ट्रक विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून याठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी पिवळ्या रंगाचा टिपर पोलीस पथकास संशयितरित्या येताना दिसला. यावेळी पोलीस पथकाने पैगम्बर सिकंदर शेख आणि अशोक बबन निळे या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सदरचा टिपर हा कर्नाटक येथून चोरून आणल्याचे समजले.
१० चाकी बनावट नंबरचा ट्रक -
तसेच अशोक बबन निळे याच्याकडे एक 10 चाकी ट्रक बनावट नंबर टाकून चालवत असल्याची माहिती पोलीस पथकास मिळाली. हा ट्रक ताब्यात घेऊन त्याची पोलिसांनी तपासणी केली असता, मूळ नंबरचे हप्ते थकले आहेत, यामुळे त्याने मुस्तफा शेख (सोलापूर) याच्याकडून सदरच्या 10 चाकी ट्रकचा नंबर बदलून तसेच वाहन रजिस्टर क्रमांक बदलून शासनाची फसवणूक करून वापरत असल्याचे पोलीस पथकास आढळून आले.
भिगवण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल -
या कारवाई पोलिसांनी एक पिवळ्या रंगाचा 6 चाकी टिपर आणि 10 चाकी टाटा ट्रक असा एकूण २० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत भिगवण पोलिस स्टेशन येथे भा द वी 379,420,465, 467, 468, 471, मा पो का क 124 सह मोटार वाहन का क 1988 चे ३(१) 181, 139/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आणि मुद्देमाल पुढील तपास कामी भिगवण पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
हेही वाचा - भोसरी पोलिसांची तुफान कामगिरी; 18 लाखांचा मुद्देमाल जप्त