पिंपरी-चिंचवड -प्रवाशांना कोरोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, अद्याप दोन आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 28 बनावट रिपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. आरोपी 500 ते 600 रुपये घेऊन बनावट कोरोना रिपोर्ट बनवून देत असल्याचे समोर आले आहे. पत्ताराम केसारामजी देवासी वय- 33, राकेशकुमार बस्तीराम वैष्णव वय- 25 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल कुणाल शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दोन जणांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील इंदिरा कॉलेज जवळ असणाऱ्या शनी मंदिरात कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र एक टोळी प्रवाशांना पुरवत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत पोलिसांनी दोघांना अटक केले. मात्र दोन जण अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.