पुणे:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान रॉयल्य विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लागणार असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या आधारे मुंबईतील दोन सट्टेबाज हे लोणावळा परिसरातील तुंगार्ली गावच्या हद्दीत येऊन एका बंगल्यामध्ये आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत असल्याचे कळले. गुन्हे शाखेच्या पथकाने या सोसायटीतील बंगला ३ वर छापा टाकून कारवाई करत दोन सट्टेबाजांना अटक केली. त्यांच्याकडून सट्टा खेळण्यासाठी वापरलेल्या साहित्यासह एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सट्ट्यासाठी ॲपचा वापर: हे सर्व सट्टेबाज मोबाईल ॲपचा वापर करून क्रिकेट सामन्यावर सुमारे सात लाख रुपयांचा सट्टा लावत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेतील आरोपी सट्टयाचा खेळ पुढे कोणाला पाठवित आहेत तसेच कोणामार्फत कसे पाठवित आहेत? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
ही बाब पोलिसांसाठी डोकेदुखी: सट्टा हा चालू सामन्यावर लावला जातो. आता फोनवर किंवा ऑनलाईन सट्टा मोठ्या प्रमाणावर लावला जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सट्ट्याचे स्वरूप बदलले असून थेट ॲपवर सट्टा लावण्याचे प्रमाण वाढत आहे. या ऑनलाईन तंत्रामुळे सट्टेबाजांना पकडणे पोलिसांना कठीण जात आहे.