पिंपरी-चिंचवड (पुणे) - सांगवीमध्ये विवाहापूर्वी असलेल्या प्रेमसबंधातून एका तरुणाने पत्नीच्या प्रियकराचा कोयत्याने वार करून खून केला होता. ही घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालय पार्किंग परिसरात घडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने काही तासाच्या आत वडगाव मावळमधून अटक केली.
आयाज नुरमोहम्मद शेख (वय- 25, रा शिवाजीनगर, पुणे), नयन उर्फ तांड्या विजय लोंढे (वय- 19, रा- दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून सोन्या बाराथे आणि अन्य तिघेजण अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. सौरभ व्यंकट जाधव (वय- 28, संजय नगर औंध), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मृताचा भाऊ सुशांत व्यंकट जाधव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयाज याच्या पत्नीचे विवाहापूर्वी मयत तरुण सौरभ याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा आयाज याला संशय होता. याचा राग मनात धरून आयजने इतर मित्राच्या मदतीने योजना आखली आणि रविवारी दुपारी दीडच्या सुमारास मयत तरुण सौरभला बोलावले. तिथे त्यांच्यात बाचाबाची झाली यातून सौरभचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला.
सांगवीमध्ये पतीकडून पत्नीच्या प्रियकराची कोयत्याने वार करून हत्या; मुख्य आरोपीसह दोघे अटकेत - pimpari chinchwad police latest news
पत्नीच्या विवाहपूर्वीच्या प्रियकराची हत्या करण्यात आल्याची घटना सांगवीत रविवारी घडली होती. या प्रकरणी पती आयाज व त्याचा एक साथीदारास अटक करण्यात आली आहे. तर या घटनेतील तीन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्यानंतर सौरभ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर घटनास्थळावरून आरोपी यांनी पोबारा केला होता. त्यांचा शोध सांगवी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट चारचे अधिकारी घेत होते. तेव्हा, संबंधित मुख्य आरोपी हा वडगाव मावळ परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 4 च्या अधिकाऱ्यांना मिळली. त्यानुसार संबंधित ठिकाणी जाऊन आयाज आणि त्याचा मित्र नयन उर्फ तांड्या याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी सौरभचा खून केल्याची कबुली दिली आहे. अधिक तपासासाठी आरोपींना सांगवी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. इतर तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.