पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओला कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतल्या दोघांना तळेगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. एप्रिल महिन्यात २० ते २६ तारखेच्या दरम्यान तब्बल दहा ते बारा प्रवाशांना मोटारीतून नेऊन मारहाण करत लुटल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी पप्पू शिवाजी कांबळे, सनी गौतम घाडगे यांना निगडी परिसरातून अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार असल्याचे तळेगाव पोलिसांनी सांगितले.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तक्रारकर्ते प्रताप खिमाजी भानुशाली आणि त्यांचा भाऊ हे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी हिंजवडी भुजबळ चौक येथे बसची वाट पाहत थांबले होते. तेवढ्यात ओला कॅब चालकाने प्रत्येकी ३०० रुपयात अंधेरीपर्यंत सोडतो असे सांगून त्यांना गाडीत घेतले. यावेळी कारमध्ये पाठीमागील सीटवर दोघेजण अगोदरच बसले होते. भानुशाली यांनी त्यांच्याकडील रोख रक्कम २० हजार रुपये असलेली बॅग डिक्कीत ठेवली.