पुणे-कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्यांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी 12 कोटी 44 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
ससून रुग्णालयात चाचण्यांची क्षमता वाढणार, 12 कोटी 44 लाख रुपयांचा निधी मंजूर - अजित पवार - ससून रुग्णालयाला 12 कोटींचा निधी
पुण्यातील ससून रुग्णालयाच्या चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी 12 कोटी 44 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'कोरोना' संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने शुक्रवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
कोविड-19 स्राव नमुना तपासणीसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीसाठी 8 कोटी 90 लाख 97 हजार रुपयांचा तर यंत्रसामुग्रीसाठी 3 कोटी 53 लाख 6 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय इतर आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी 7 कोटी 15 लाख 81 हजार रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. या निधीतून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीची खरेदी करता येणार आहे. याशिवाय परिसेविका व अधिपरिचारिकांच्या भरण्यात आलेल्या पदासाठी आवश्यक निधी देण्यात आला आहे.