महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संत तुकाराम महाराज पालखीचे काटेवाडीत भव्य स्वागत; भक्तिमय वातावरणात पार पडले मेंढ्यांचे रिंगण

काटेवाडीतील ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने धोतराच्या पायघड्या घालून तुकोबांच्या पालखीचे स्वागत केले. त्यानंतर मुख्य मार्गापासून पालखी गावातील मैदानावर नेण्यात आली.

मेंढ्यांचे रिंगण

By

Published : Jul 4, 2019, 2:16 PM IST

पुणे- जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने बारामती शहरातल्या मुक्कामानंतर बुधवारी काटेवाडीच्या दिशेने प्रस्थान केले. ‘ज्ञानेश्वर माऊली तुकाराम’ नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर अशा भक्तीमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मेंढ्यांचे पहिले रिंगण काटेवाडी येथे बुधवारी पार पडले.

तुकोबांच्या पालखीचे स्वागत

यावेळी काटेवाडीतील ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने धोतराच्या पायघड्या घालून तुकोबांच्या पालखीचे स्वागत केले. त्यानंतर मुख्य मार्गापासून पालखी गावातील मैदानावर नेण्यात आली. यानंतर पालखीभोवती रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

पालखीभोवती केलेल्या रिंगणामध्ये सर्वप्रथम मेंढ्या धावल्या. त्यांच्यापाठोपाठ पताकावाले, विणेकरी आणि टाळकऱ्यांनी रिंगण धरले. रिंगणाच्या पाच फेऱ्या पूर्ण होईपर्यंत अखंड तुकोबा आणि माऊलीचा नामघोष सुरू होता. रिंगण सोहळ्यानंतर पालखीने इंदापूर तालुक्यातील सणसरकडे प्रस्थान केले.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काटेवाडी गावात दाखल झाल्यावर परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून स्वागत करण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. १३९ वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. संत गाडगे महाराजांच्या शिकवणुकीतून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. काटेवाडी गावाच्या वेशीजवळ आल्यानंतर पालखी खांद्यावर घेण्यात येते. त्या वेळी ग्रामस्थ पायघड्या घालून पालखीचे स्वागत करतात.

पालखी विसावल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी काटेवाडीत पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पताका, स्वागत कमानी लावून सजावट केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details