पुणे -शिर्डी (जि. अहमदनगर)येथील साईबाबादेवस्थान परिसरात पोशाख संबंधी फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई गुरुवारी (दि. 10 डिसें.) सकाळी साडेआठ वाजता शिर्डीसाठी रवाना होणार आहेत. बंदी असली तरी शिर्डीला जाणारच देसाईंचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील सातारा रोडवर धनकवडी येथे असलेल्या निवासस्थानातून त्या गुरुवारी सकाळी शिर्डीला जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, तृप्ती देसाई यांना शिर्डी परिसरात येण्यास मज्जाव करणारी नोटीस बजावण्यात आली आहे.
संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार दिल्याने शिर्डीत जाणारच
तृप्ती देसाईंना शिर्डी हद्दीत प्रवेश करण्यास 8 डिसेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत बंदी करण्यात आली आहे. याबाबत आदेश शिर्डीचे विभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी दिले आहेत. शिर्डी पोलिसांनी तृप्ती देसाईंना त्यांच्या घरी जाऊन या आदेशाची नोटीस बजावली आहे. मात्र, ही नोटीस एकतर्फी असल्याचे तृप्ती देसाई यांचे म्हणणे आहे. शिर्डी संस्थानने लावलेला फलक अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधातील आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून आम्हाला नोटीस दिली जाते, असे देसाईंचे म्हणणे आहे. संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला दिला आहे. त्यामुळे आम्ही शिर्डीत जाणारच, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.