बारामती (पुणे) - बारामती-पाटस महामार्गावर उंडवडी कडेपठार येथे शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दारुच्या बॉक्सने भरलेला ट्रक पलटी झाला. ट्रकमध्ये ६५ लाख रुपये किमतीचे ९५० बॉक्स भरले होते. अशी माहिती चालक निलेश गोसावी व किनर अंकुश बेंद्रे (रा. बारामती) यांनी दिली.
पोलीस पाहून लोकांनी काढला पळ -
पिंपळी (बारामती) येथील कंपनीचा दारुने भरलेला ट्रक घेऊन जळगाव येथे निघाला होता. पहाटे साडेचारच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने ट्रक उंडवडी कप येथील पवार ढाब्यासमोर पलटी झाला. दारूचा ट्रक पलटी झाल्याची घटना वा-यासारखी आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने येथील नागरिकांनी पिशव्या भरुन दारुच्या बाटल्या भरुन पळून नेल्या. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. परंतु ड्रायव्हर व क्लिनर यांना कोणीही गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली नाही. सकाळ पर्यंत लोकांनी दारु लुटण्यावर भर दिला असताना बारामती ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल होताच लोकांनी दारुच्या बाटल्या सोडून पळ काढला.