महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : म्युकरमायकोसिस'वर शहरी गरीब योजनेतून उपचार; मनपाच्या दवाखान्यात मिळणार मदत - pune urban poor scheme for mucormycosis

पुणे महानगरपालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करताना याठिकाणी असलेले ऑपरेशन थिएटर अद्ययावत करुन सज्जताही ठेवण्यात येत आहे. शिवाय उपचार करताना या आजारासंबंधी तज्ञ डॉक्टरांची नेमणूकही तातडीने केली जात आहे.

pune hospital
पुणे रुग्णालय

By

Published : May 18, 2021, 9:42 PM IST

पुणे -कोरोना विषाणू आजारातून बरे झाल्यानंतर, आता म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यावरील उपचार महागडे आहेत. यावर उपचार घेणे, सर्वसामान्य रुग्णाला परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरात म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारांचा समावेश शहरी गरीब योजनेत करण्यात आला आहे. आजपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य संबधित रुग्णांच्या बिलावर शहरी गरीब योजनेतून दिले जात होते. मात्र, आता म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा यात समावेश करुन म्युकरमायकोसिसच्याच उपचारांसाठी ही मर्यादा १ लाखांवरुन ३ लाख रुपयांपर्यंत वाढण्यात आली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

शहरातील मनपाच्या सर्व दवाखान्यांमध्ये या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता महापौर मोहोळ यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमवेत महत्वाची बैठक घेऊन उपचारांसंदर्भात निर्णय घेतले.

हेही वाचा -पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही लसीकरण बंद; नागरिक हवालदिल

महापौरांचे रुग्णांना आवाहन -

याबाबत महापौर मोहोळ पुढे म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी रूग्णालयात १५ बेड हे म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच म्युकरमायकोसिस आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास आपल्या जवळील रूग्णालयात तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

पुणे महानगरपालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करताना याठिकाणी असलेले ऑपरेशन थिएटर अद्ययावत करुन सज्जताही ठेवण्यात येत आहे. शिवाय उपचार करताना या आजारासंबंधी तज्ञ डॉक्टरांची नेमणूकही तातडीने केली जात आहे. कोरोनावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी म्युकरमायकोसिस बाबतीत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. लवकर निदान झाले तर योग्य उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे आवश्यक आहे', असेही महापौर म्हणाले.

हेही वाचा -महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून म्यूकरमायकोसिसवर मोफत उपचार

ABOUT THE AUTHOR

...view details