पुणे :आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना हे बघा तृतीयपंथीयांचे सरदार, असे वक्तव्य केले होते. या विरोधात तृतीय पंथीय आक्रमक झाले आहेत. राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. आमदार नितेश राणे विरोधात मध्यरात्रीपासून पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर तृतीयपंथीय समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी पडून नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत नाही आहे. पण जोपर्यंत नितेश राणे यांच्यावर पुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीने आम्ही आंदोलन करू, अशी आक्रमक भूमिका यावेळी तृतीयपंथीयांनी घेतली आहे. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
ट्रॅफिक जाम करण्याचा प्रयत्न :तृतीयपंथी आक्रमक होत रास्ता रोको करत असताना पोलिसांकडून या तृतीय पंथीना धरपकड करण्यात आली. यावेळी मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाले. यावेळी बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील म्हणाले की, आम्ही त्यांना आंदोलन करू देत होतो. पण जेव्हा त्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही त्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून ट्रॅफिक जाम करण्याचा प्रयत्न केला जात होता. तेव्हा आम्ही त्यांना पकडले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.