पुणे - सध्या ३१ वा रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. यानिमित्त वाहतूक पोलीस अपघात कसे टाळाल याविषयी आवाहन करत आहेत. यावेळी मकर संक्रांत निमित्त विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांना तीळ गुळाचे हेल्मेट देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर, ज्यांनी हेल्मेट घालून नियम पाळले अशांना गुलाबपुष्प आणि तिळगुळ देऊन प्रत्साहन देण्यात आले.
वाहतुकीबाबत जनजागृतीसाठी पिंपरी-चिंचवडमधील चाफेकर चौकात एक अपघातग्रस्त वाहन ठेवण्यात आले असून याची अनेक नागरिक चौकशी करत आहेत. सध्या ३१ वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. त्यामुळे सीट बेल्ट लावणे, मोटारीचा वेग याबद्दल वाहतूक पोलीस चौकात अपघातग्रस्त वाहन ठेवून माहिती देत आहेत. या वाहनात चौघेजण बसले होते. मात्र, त्यांनी भरधाव मोटार एका झाडावर आदळली आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यांनी सीटबेल्ट लावला असता तर त्यांचे प्राण वाचले असते असा पाढा वाहतूक पोलीस नागरिकांना वाचून दाखवत आवाहन करताहेत.