राजगुरुनगर (पुणे) -देशात सर्वाधिक वाहन खरेदी होणाऱ्या शहरात वाहतुक कोंडी समस्या जटील झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुणे -नाशिक महामार्गावरील वाहतुक कोंडी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. राजगुरुनगर ,चाकण चौकात वाहतुक कोंडीमुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहेत.
पुणे -नाशिक महामार्गावरील चाकण, राजगुरुनगर, खेड घाट, मंचर, कळंब, नारायणगाव, आळेफाटा या शहरांच्या बाजुने बायपासचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा मोठा भार शहरीभागातील रस्त्यांवर पडत आहे. अशातच अशातच वाहन चालकांच्या बेशिस्तीमुळे दिवसभर वाहतुक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
वाहतुक कोंडीमुळे पोलीसांची कसरत...
भल्या पहाटेपासुन कामगारवर्ग, प्रवासी घराबाहेर पडून पुणे -नाशिक महामार्गावरुन प्रवास करतात. तरीही त्यांना सकाळपासूनच वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतुक पोलीस दिवसभर कसरत करत असतात. मात्र, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुक कोंडी दूर करताना पोलीसांची दमछाक होत आहे.