पुणे- बाहुल्या हा लहानथोरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. क्रिएटिव्ह डॉल्सतर्फे संवाद आणि मराठी संवर्धन मंडळ यांच्या सहकार्याने बालगंधर्व कलादालन येथे कापडी बाहुल्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याठिकाणी ग्रामीण आणि शहरी जीवनशैलीसह लोककलांचे दर्शन कापडी बाहुल्यांच्या माध्यमातून दाखवून देण्यात आले आहे.
रामायणाशी संबंधित प्रसंग पाहा कापडी बाहुल्यांचे रूपात हेही वाचा-लोकशाही निर्देशांकाच्या क्रमवारीनुसार भारतात 'सदोष लोकशाही'
लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कापडी बाहुल्यांचा खजिना पुणेकरासाठी खुला झाला आहे. कापडी बाहुल्यांच्या माध्यमातून लोप पावत चाललेले पारंपरिक व्यवसाय, रुढी-परंपरा, लोककला आणि संस्कृती यांचे दर्शन घडविणाऱ्या कापडी बाहुल्यांचा खजिना पुणेकरांसाठी खुला झाला आहे.
छंद म्हणून गेली १८ वर्षे सविता गोरे या बाहुल्या बनवत आहेत. त्यामधील वैविध्य आणि वेगळेपणा इतरांनाही पहायला मिळावा म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या प्रदर्शनाचे तिसरे वर्ष आहे. यात विविध भाव मुद्रांच्या आणि विविध प्रकारच्या लोकसंस्कृतीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. काळाच्या ओघात मागे पडत असलेल्या अनेक पारंपारिक गोष्टी या प्रदर्शनात समोर आणण्याचा उद्देश आहे. रामायणाशी संबंधित प्रसंग हे यंदाच्या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण आहे. त्यामध्ये सीता स्वयंवर, सुवर्णमृगाची शिकार, लक्ष्मण रेषा ओलांडणे, रावणवध अशा अनेक प्रसंगांचा समावेश आहे. तसेच संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, पंढरीची वारी, गरबा नृत्य, कृष्ण-यशोदा यांच्यासह लोहार, पोतराज, कुंभार, वैदिन अशा पारंपारिक व्यावसायिकांच्या बाहुल्या देखील प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. बालगंधर्व कलादालनात शनिवार २५ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे.