पुणे- कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मार्च महिन्यात देशात सुरू करण्यात आलेला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारनेदेखील मिशन बिगीन अगेनचा नारा देत राज्याच्या अर्थ चक्राचा गाडा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यामध्ये लहान मोठे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता पर्यटन स्थळे अद्यापही लॉकच आहेत. त्यामुळे गडकिल्ल्यांवर विंसबून असलेला पर्यटन व्यवसाय अद्यापही पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत. माथेरान सुरू झाले मात्र गडकिल्ल्यांसाठीच बंदी का? असा सवाल सिहगडावरील स्थानिक व्यवसायिक विचारताहेत.
पर्यटकांविना ओस पडलेले व्यवसाय सरकारने लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता आणली खरी, मात्र ग्रामीण भागातील पर्यटन स्थळावरील या बंदीने स्थानिकांच्या हातातल्या पोटावरच्या व्यवसायाला लगाम बसला आहे. गड किल्ले आणि पर्यटनस्थळांवरील बंदी उठवून येथील गोरगरिबांच्या विझलेल्या चूली आतातरी पेटवा, अशी साद सिंहगडच्या स्थानिक व्यावसायिकांनी सरकारला घातलीय. सध्या पावसाळा आहे, सिंहगड हिरवाईने नटला आहे. पावसाळ्यात सह्याद्री पर्वतरांगेच मनमोहक निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी गर्दी करतात. मात्र, यंदा कोरोना विषाणूचा संसर्गामुळे सर्वच पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली. राज्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. इतर उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, पर्यटनस्थळे अद्यापही लॉकच आहेत. त्यामुळे पर्यटकांची पाऊले अद्यापही इकडे वळताना दिसत नाहीत. परिणामी गडकिल्ल्यांवरच्या पाऊल वाटाही आता शेवाळल्या आहेत. तर गडावरील हॉटेल, झोपड्या मोडकळीस आल्या आहे. सिंहगडावर ४०० लहान - मोठे विक्रेते हॉटेल व्यावसायिक यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून फक्त रेशनींगवर मिळत असलेल्या अन्न-धान्यांवर आम्ही आमचं जीवन जगत आहोत, आमच्या हाताला ना.. खिशात पैसा अशी आमची अवस्था झाली असल्याची व्यथा येथील छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी व्यक्त केली. त्यामुळे या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने लवकरात लवकर पर्यटनस्थळे सुरू करण्यास परवानगी द्यावी आणि पर्यटन व्यवसायाला चालना द्यावी अशी मागणी सिंहगडावरील स्थानिकांनी सरकारपुढे केली आहे. पर्यटनस्थळावर अवलंबून असलेला मोठा वर्ग आजही चिंताग्रस्त असून त्यामुळे ग्रामीण भागातील लहान मोठ्या हॉटेल ठप्पच आहेत. गडावरील अनेक छोटे-मोठे व्यवसाय अक्षरशः आर्थिक संकटात सापडले आहेत. काही दिवस मोफत मिळालेल्या अन्नधान्यावर पोटाची भूक भागवली. मात्र आता कोणीच मदत करत नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. गडावरील हॉटेल चालक, दही-ताक विक्रेते आणि खासगी प्रवासी वाहन चालक मालक असे जवळपास साडे चारशेहून व्यवसायिकाना लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकजण आज नोकरी आणि रोजदारींचे पर्याय शोधत असताना पदरी मात्र निराशा पडत आहे. पुण्यासह राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे अद्यपही शासनाने गडकिल्ले सुरू करण्याचा निर्णय घेतला नसल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे केंद्र व इतर विभागाचे काही पर्यटनस्थळ सुरु झाली तरी राज्य संरक्षित स्थळे तूर्तास सुरु होणार नसल्याची चिन्हे आहेत. त्याचा मोठा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसत आहे.